रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

शिक्षणाच्या बाजारात 'माणसं' तयार करणारा कारखानदार : कर्मवीर भाऊराव पाटील.

शिक्षणाच्या बाजारात 'माणसं' तयार करणारा कारखानदार : कर्मवीर भाऊराव पाटील.



'रयत' हा शब्द उच्चारताच अंगात एकाच वेळी स्वाभिमान आणि अभिमान जागा होतो. अन त्याच वेळी कर्तव्याचं भान येत. रयत शिवबाची असो वा आमच्या कर्मवीर अण्णांची ती इथल्या प्रत्येकाला जगण्याचं बळ देत आलीये. माणुस म्हणून घडवत आलीये.

कोल्हापुरातल्या कुंभोज गावात २२ सप्टेंबर १८८७ ला कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म झाला. त्यांनी सांगली जिल्ह्यातल्या 'विटा’ या गावात प्राथमिक शिक्षण घेतलं.
पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये अण्णा दाखल झाले. त्या ठिकाणी शिक्षण होत असताना महात्मा जोतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे व राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामुळे ते प्रभावित झाले. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला व ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले.

शिक्षणानंतर पोटापाण्यासाठी ओगले ग्लास वर्क्‍स, किर्लोस्कर ब्रदर्स या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून अण्णांनी काम करायला सुरुवात केली.  काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली. त्यांच्या भ्रमंतीमुळे त्यांना ग्रामीण विभागातील जनतेच्या प्रचंड दारिद्रयाची, भयंकर अज्ञानाची व अंधश्रद्धेची जाणीव झाली. त्यांच्या या बहुतेक समस्यांवर ‘शिक्षण’ हा एकमेव महत्त्वाचा उपाय आहे हे त्यांना जाणवलं.

ग्रामीण भागातील प्रश्न जर सोडवायचे असतील तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरूरीचे आहे असे त्यांना वाटते, म्हणून त्यांनी १९१९ मध्ये ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. सर्व जातीच्या मुलांना, गरीब शेतक-यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे असा प्रयत्न त्यांनी केला. आज 'रयत शिक्षण संस्था' शताब्दी महोत्सव साजरा करत आहे.

शिक्षणाच्या बाजारीकरणात आज बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना 'रयत' एकमेव आधार आहे.  रयतेतुन केवळ विद्यार्थी नावाचं प्रॉडक्ट शिक्षणाच्या बाजारपेठेत उतरवलं जात नाही. 'स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद' अस म्हणत इथं विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण केला जातो. अन तो केवळ एका जातीपुरता, एका धर्मापुरता मर्यादित नाही, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासारखा वैश्विक स्वाभिमान असतो. म्हणूनच रयतेमध्ये 'माणूस' घडतो.

रयत मध्ये शिक्षण पूर्ण करण्याच्या घरच्यांना आग्रह हा बाजारु युगात पाऊल टाकल्यावर समजला. आजही इथं पैश्यांसाठी प्रवेश अडवला जात नाही. आज अण्णांची जयंती आणि रयतेच शताब्दी महोत्सवी वर्ष.

संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त अनेक उपक्रम राबविले जात आहे. बाजारू संस्कृती अण्णांनी घालून दिलेल्या मार्गावरून आपला तोल ढळू न देण्याचं मोठं आव्हान रयत सेवकां पुढे आहे. अण्णांनी निवडलेली वाट मखमली आणि हमरस्त्यावरुन जाणारी नाहीये. वाड्यावस्त्या, गाव, डोंगरदऱ्या यातून ही वाट शिक्षणाची ज्योत पेटवत, एका एका माणसाला सोबत घेऊन स्वतःला स्वतःचा मार्ग शोधायला लावणारी आहे. 

या वाटेवर सद्यपरिस्थितीत अनेक अडथळे आहेत. अनेक आमिष आहेत.पण हेच अडथळे, हीच आमिष पार करुन 'माणुस' घडवण्याच काम निस्वार्थीपणे रयत सेवकांनी करायला हवयं. तरच ती अण्णांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. अन्यथा अण्णांच्या वाटेवर चालण्याच ढोंग करणारे तुम्ही कृतघ्न असाल. खरा रयत सेवक हा कृतघ्नपणा करणार नाही, हा विश्वास देखील आहे. आणि तो खरा ठरो हीच अण्णांना आदरांजली वाहताना अपेक्षा....
कारण 'रयत' कधीच कोण्या एकाच्या मालकीची नसते ती फक्त अन फक्त रयतेचीच असते...

1 टिप्पणी: